उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वादात शिवसेना निवडणूक चिन्ह (Shiv Sena Election Symbol) धनुष्यबाण(Dhanushyaban) कोणाचे? या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना नक्की कोणाची याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सादर झालेल्या पुराव्यांची पडताळणी करुन निवडणूक आयोग आजच काय तो फैसला करुन टाकणार का? याबाबत उत्सुकता आहे. त्यातच शिंदे गटाकडून या प्रकरणाची तड तातडीने लावावी अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे गटाची मागणी आहे की, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ आणि समर्थनही नाही. त्यामुळे हा गट बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण वापरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तातडीने खातरजमा करुन निर्णय घ्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका कोणता निर्णय आणि तो कधी घेते याबाब केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचेही लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Shiv Sena Dussehra Rally: उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेना मेळाव्यात 'या' दोन नेत्यांचे भाषण ठरले हिट; घ्या जाणून)
दरम्यान, लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात, ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी नोंदवलेल्या मतात म्हटले आहे की, ''एका परिस्थितीत आज निकाल लागला तरी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडेच राहू शकतं''.
प्राप्त माहितीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपापल्या परीने निवडणूक आयोगाकडे पुरावे दिले आहेत. या पुराव्यांची तथ्यपडताळणी करुन निवडणूक आयोग महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतो. पुरावे सादर करण्याची मुदत आज संपत आहे. परिणामी निवडणूक आयोग आजच निर्णय जाहीर करणार की आणखी काही वेळ घेणार याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत तरी निवडणुक आयोगाच्या टेबलवर हे प्रकरण प्रलंबित आहे.