दरवर्षी मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्क (Shivaji Park) इथे शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Rally) मोठ्या उत्साहात साजरा होतो. आता पक्षामध्ये दोन गट पडल्याने यंदा नेमका कोणता गट शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेतो याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. अशात ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी, मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या वार्षिक दसरा मेळाव्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेत असल्याबद्दल उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
म्हस्के म्हणाले की, ‘ठाकरे गट शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे आणि विचारसरणी विसरला आहे आणि त्यामुळे त्यांना मेळावा आयोजित करण्याचा अधिकार नाही. त्यांनी (ठाकरे गटाने) बाळासाहेब ठाकरेंची शिकवण सोडली आहे. त्यामुळे त्यांना आता दसरा मेळावा घेण्याचा काय अधिकार आहे? बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.’
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार का?, असा सवाल पत्रकारांनी केला असता, हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे म्हस्के म्हणाले. याआधी उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष वार्षिक मेळावा घेणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. सेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा राज्यातील प्रमुख राजकीय कार्यक्रमांपैकी एक आहे आणि तो बाळ ठाकरेंच्या धडाकेबाज भाषणांसाठी ओळखला जातो. (हेही वाचा: Shiv Sena's Dussehra Rally 2022: शिवसेना दसरा मेळावा शिवतिर्थावरच होईल- उद्धव ठाकरे)
दरम्यान, पाच ऑक्टोबरला शिवाजी पार्क मैदानात नेमक्या कोणत्या गटाने दसरा मेळावा घ्यावा यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. ठाकरे गटाने बीएमसीला दीनदा पत्र पाठवले आहे, मात्र याबाबतचा निर्णय अजूनही अनिर्णित ठेवल्याचे समजत आहे.