शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मोठा मेळावा (Dussehra Rally) भरतो. या मेळाव्याला ऐतिहासिक तसेच राजकीय महत्वदेखील आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख शिवसैनिकांना संबोधित करतात. या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. प्रत्येकवर्षी दादरच्या शिवाजी पार्क येथे या मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शिवसेना आपला वार्षिक दसरा मेळावा सभागृहामध्ये आयोजित करणार आहे. यासाठी सायनचा षण्मुखानंद हॉल (Shanmukhananda Hall) ही जागा निश्चित करण्यात आली आहे.
याठिकाणी 50 टक्के क्षमतेसह 2021 चा मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. पक्ष नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्यास उत्सुक होता, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 चा प्रोटोकॉल लक्षात घेऊन इनडोअर मेळाव्याला पसंती दिली आहे.
याबाबत सेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही सोमवारी पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांना औपचारिक पत्र देऊ. 50 टक्के आसन क्षमतेसह षण्मुखानंद सभागृहात हा मेळवा आयोजित केला जाणार आहे. यासाठी सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील आणि कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील केले जाईल.’
संजय राऊत यांनी सांगितले की, ‘दसरा मेळावा होईल मात्र तो फक्त ऑनलाइन कार्यक्रमच होऊ नये व पूर्वीप्रमाणेच त्याचे आयोजन व्हावे असे आम्हाला वाटते. उद्धवजींचेही असेच मत आहे. आम्ही कोविड-19 प्रोटोकॉल आणि निकषांचे पालन करून हा मेळावा असा आयोजित केला जाईल यावर चर्चा करीत आहोत. अंतिम निर्णय उद्धवजी घेतील.’ (हेही वाचा: महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका)
गेल्या वर्षी देखील, कोविड-19 लॉकडाऊनमुळे सेनेचा दसरा मेळावा एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवाजी पार्कव्यतिरिक्त इतर ठिकाणी ही रॅली आयोजित करण्याची पहिलीच वेळ होती. दसरा मेळावा हा सेनेच्या वार्षिक दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी सेनेची जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर दसरा मेळावा हा वार्षिक कार्यक्रम झाला. आता शिवसैनिकांसह महाराष्ट्रातील जनता या दिवशी पक्ष प्रमुखांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत असते.