Devendra Fadnavis On Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका
Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे समाजासमोर महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. हे सरकार ढोंगी असल्याचे फडवणीस यांनी टोला लगावला आहे. लखमीपुर खैरी हिंसाचार प्रकरणी बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मात्र एकाही पैशांची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अद्भूतपूर्व संकटात आहे. तर हे सरकार आल्यानंतर 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचसोबत सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. बांधावर जाऊन 25-50 हजारांच्या मदतीसह अन्य घोषणा या हवेत विरल्या गेल्याचे फडणवीस यांनी म्हटले.(Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका)

पुढे फडणवीस यांनी असे म्हटले की, राज्य सरकारमधीलच घटक पक्षांवर अशी वेळ आली की पूर्वीचे भाजपचे सरकार तरी मदत करायचे. पण या सरकारला आम्ही मदत करतोय आणि त्यांना मदत करायची नाही आहे. त्यामुळे आजचा जो बंद आहे तो ढोंगीपणाचा कळस आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेला हा बंद लखमीपुर खैरी हिंसाचारावर संवेदनशीलता दाखवण्यासाठी नव्हे तर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला हा बंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासन आणि पोलिसांची मदत घेऊन नागरिकांना बंद ठेवण्याची दमदाटी केली गेली आहे. खरंतर या सरकारचे नाव बंद सरकार असायला हवे. कारण या सरकारने सर्व योजना सुद्धा बंद केल्या. कोरोनाच्या काळानंतर आता कुठे व्यापाऱ्यांचे उद्योग रुळावर येऊ लागले होते पण अशातच सरकारने बंद पुकारला आहे.(Maharashtra Bandh: मुंबई लोकल ट्रेन त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु; अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत)

दरम्यान, नुकत्याच राजस्थान मध्ये काँग्रेसकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली गेली. यावर का हे मंडळी बोलत नाही असा सवाल ही अखेरीस फडवणीस यांनी उपस्थितीत केला आहे. तर शेतकऱ्यांना भाजपच्या विरोधात करुन हे सरकार आपली पोळी भाजू पाहत असल्याचे ही फडवणवीस यांनी म्हटले आहे.