राज्याच्या राजकारणात ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु; शिवसेना नेत्वृत्वाची भाजपवर जोरदार टीका
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

दै. सामनातून होणारी टीका थांबत नाही तोपर्यंत चर्चा पुढे सरकणार नाही, असे भाजपने (BJP) म्हणून काही तास उलटाच्या आतच शिवसेनेने पुन्हा एकदा सामनाच्या माध्यमातून भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेना (Shiv Sena) ही कोणत्याही 'पेच' आणि चक्रव्युहाला घाबरत नाही. लढणाऱ्यांना संकटांची भीती नसते असे सांगतानाच राज्याच्या राजकारणात आता 'गरज सरो आणि वैद्य मरो' या म्हणीचा दुसरा अंक सुरु झाला आहे, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दै. सामनामध्ये (Saamana Editorial) लिहिलेल्या संपादकीयामध्ये ही टीका करण्यात आली आहे.

सामनामधील संपादकीयामध्ये म्हटले आहे की, '२०१४ मध्ये देशात मोदी नेतृत्त्वाखाली भव्य यश मिळताच भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली व २०१९ मध्ये तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो आणि वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला. पण इथे वैद्य मरणार नाही त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे व ही संजीवनी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्रीपद हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर बिनसत्तेच्या पदासाठी देशात इतका आटापिटा का होतो आहे? मुख्यमंत्रीपदाचा किंवा समसमान पदवाटपाचा पेच पडला आहे हे नक्की. मात्र जर सगळे काही आधीच ठरले असेल तर पेच का पडावा?', असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)

दरम्यान, याच लेखात पुढे 'युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षाही महत्त्वाचा असतो परस्परांमध्ये झालेला सत्तावाटपाचा करार. निवडणूक लढवताना तो पाळला पाहिजे आणि निकालानंतरही हा करार दोन्ही बाजूंनी पाळणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. शिवसेनेची मागणी आहे ती एवढीच. युतीच्या वाती पेटवताना विश्वासाचे तेल समईत ओतले. ते तेल नव्हे गढूळ पाणी होते का? तर अजिबात नाही. सत्तापदाचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला व तो सहमतीने वापरला. आता एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे सत्तापदात येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील.', असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.