शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचे कणकवलीचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या रडारवर होते राणे पिता-पुत्र. 'नारायण राणे (Narayan Rane) ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा', असा टोलाच उद्धव यांनी या सभेत लगावला. इतकच नव्हे तर 'ही पाठीमागून वार करणारी औलाद आहे', असे सांगत राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडत आपला मित्रपक्ष भाजपला देखील सावधगिरीचा इशारा दिला आहे.
15 ऑक्टोबरला नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या प्रचारासाठी व नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवलीत सभा झाल्यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेऊन राणे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशाचा समाचार घेतला. 'संपूर्ण कोकण आम्हाला भगवा करायचा आहे. येथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर ती तोडून मोडून टाकण्याची धमक आमच्यात आहे', असा इशाराच यावेळी उद्धव यांनी दिला.
हेदेखील वाचा- नारायण राणे, निलेश राणे यांचा भाजप पक्षप्रवेश; कोकणाच्या विकासासाठी पक्षांतर केल्याची व्यक्त केली भावना
तसेच काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी 'दहा रुपयांत जेवण देणार ते मातोश्रीत शिजवणार का' उद्धव ठाकरेंना जो सवाल केला होता त्यावर उत्तर देत जो मातोश्रीच्या मिठाला जागला नाही, तो मला काय शिकवणार? असे जाहीर सभेत बोलताना सांगितले. तसेच कणकवलीत जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावले होते. मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार येथे दिला असता त्याच्या प्रचाराला मी नक्कीच आलो असतो, असेही ते यावेळी म्हणाले.
कणकवलीच्या सभेत नारायण राणे आणि त्यांच्या मुलावर उद्धव ठाकरे हे चांगलेच हल्लाबोल करत होते. 'मी मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा माणूस आहे. मित्राच्या घरी कोणी चोर, दरोडेखोर घुसत असतील तर त्यांना सावध करायचं असतं. तेच मी करत आहे. भाजपच्या मित्रांना सावधगिरीचा इशारा द्यायला मी येथे आलो आहे.' असेही ते म्हणाले.
'आज स्वाभिमान हा शब्द खूप आनंदित झाला असेल कारण या शब्दाला इतके दिवस काळिमा लागला होता. इकडे वाकवा मान, तिकडे वाकवा आणि म्हणे 'माझा पक्ष स्वाभिमान' असे सांगत नारायण राणे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.