शिर्डी: रामनवमी निमित्त साईचरणी कोट्यावधींचे दान
Shirdi Sai Baba Mandir(Photo Credit: Wikimedia Commons )

रामनवमी निमित्त शिर्डीतील साई बाबा मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या काळात अनेक भक्त शिर्डीला भेट देऊन साईबाबांच्या चरणी भरभरुन दान करत असतात. यंदा रामनवमीच्या उत्सवात साई भक्त लाखोंच्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आणि त्यांनी एकूण 4 कोटी 16 लाख रुपयांचे दान केले आहे. 12 ते 14 एप्रिल या काळात रामनवमी निमित्त असलेल्या उत्सवादरम्यान ही रक्कम दान करण्यात आली. (शिर्डीमध्ये 12 ते 14 एप्रिल दरम्यान रंगणार श्रीरामनवमी उत्‍सव)

या एकूण रक्कमेपैकी दानपेटीत भाविकांनी 1 कोटी 92 लाख रुपये दान केले. तर डोनेशन काऊंटरवर 98 लाख रुपये देणगी देण्यात आली. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 11 लाख रुपये भक्तांनी दान केले आहेत.

पैशांशिवाय सोन्या-चांदीच्या स्वरुपातही दान करण्यात आले. यात 7 लाख 61 हजारांचे सोने, 1 लाख 11 हजारांची चांदी आणि 14 देशांचे पाच लाखांचे चलन असे दान करण्यात आले. एकंदरीत 4 कोटी 16 लाख रुपयांची देणगी साईचरणी अर्पण करण्यात आली आहे.