शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस तर राजेश राठोड, राजकिशोर उर्फ पापा मोदी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Legislative Council Election 2020

Maharashtra Legislative Council Election 2020: विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी यावेळी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. या दोघांच्या रुपात राष्ट्रवादीने अनुक्रमे सातारा आणि अकोला जिल्ह्याला संधी दिली आहे. तर काँग्रेसने राजेश राठोड (Rajesh Rathod), राजकिशोर उर्फ पापा मोदी (Rajkishore alias Papa Modi), हे दोन उमेदवार जाहीर केले आहेत.

विधानसभेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप अशा सर्वच उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाने दोन उमेदवारांचा आग्रह धरल्याने निवडणूक बिनविरोध होणार किंवा कसे याबाबत उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.

जयंत पाटील ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, ''श्री. शशिकांत शिंदे, सातारा व श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.'' (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Election 2020: भाजप उमेदवार प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द)

बाळासाहेब थोरात ट्विट

शिवसनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने मात्र दोन उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेसने राजेश राठोड आणि बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी दिली आहे.