राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबई येथे पार पडले. या वेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत भाजपवर टोलेबाजी केली. भारतीय जनता पक्षाला (BJP) देशात ऐक्य नको आहे. हे शरद पवार यांनी 25 वर्षांपूर्वी सांगितले. आम्हाला मात्र, ते दोन वर्षांपूर्वी समजले, असे म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला. शरद पवार यांचे विचार पक्के आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी ते जे विचार मांडत होते. तोच विचार ते आजही मांडत आहेत.
राज्यात जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा हे सरकार पंतांचं सरकार आहे, असे पवार सांगत असंत. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असे ते नेहमी सांगत. मराठी माणसाची मुंबईवर पकड कायम ठेवायची असेल तर मुंबईतील जमीनी व्यापाऱ्यांना विकू नका असेही ते आजही आवर्जून सांगतात, अशा शब्दांत राऊत यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Shivsena: फडणवीस यांची शिवसेनेवर टीका; आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध आक्रमक बोलतात, त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल )
पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की, आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आहे. योग्य वेळी आम्ही तो फोडू. शरद पवार यांना मी दिल्लीत खूर्ची दिली. यावरुन अनेकांनी टीका-टिप्पणी केली. शरद पवार यांना मी खुर्ची का दिली? हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांची ही 61 भाषणे वाचायलाच हवीत. त्यांनी जे 25 वर्षांपूर्वी सांगितले ते आम्हाला दोन वर्षांपूर्वी समजले. आपला देश किती मागे चालला आहे. हे आम्हाला आता कळू लागले आहे. आज प्रश्न उपस्थित करणे हे किती कठीण होऊन बसले आहे, प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांनाच माहित असल्याचेही राऊत म्हणाले.
भाजप देशाला उलट्या दिशेने घेऊन निघाला आहे. तो देशाचेही तुकडे करत आहे. खरं म्हणजे शरद पवारांच्या भाषणाचे हे पुस्तक पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना पाठवायला हवे. पवरांनी जे 1996 मध्ये सांगितले ते आम्हाला आता कळू लागले आहे. पवारांच्या या ग्रंथाला भगवा रंग घातला आहे. मी आपला आभारी आहे कारण 'अवघा रंग एकची झाला'. महाराष्ट्राचा, देशाचा रंग भगवा असल्याचेही राऊत या वेळी म्हणाले.