Shahnawaz Shaikh Real Hero: कोरोना रुग्णांना ऑक्सीजन पोहोचवण्यासाठी पठ्ठ्याने विकली 22 लाखांची Ford Endeavour कार;  शाहनवाज शेख बनले Oxygen Man
Oxygen Man | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातच ऑक्सिजनचा (Oxygen ) तुठवडा जाणवतो आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने राज्यात, देशात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रुग्णासाठी ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder) मिळविण्यासाठी सऱ्हास धडपडत आहेत. त्यातच कोरोना रुग्ण म्हटले की अनेक लोक हात वर करताना दिसतात. अशात मुंबईतील शाहनवाज शेख (Shahnawaz Shaikh) नामक एक व्यक्ती ऑक्सिजन मॅन (Oxygen Man) म्हणून पुढे आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले आहे की, कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी मुंबई (Mumbai) शहरातील शहानवाज शेख यांनी चक्क 22 लाखांची Ford Endeavour कार विकली आहे. कार विकून आलेल्या पैशांतून ते लोकांना ऑक्सिजन पुरवतात. एका फोनवर ते ऑक्सिजन उपलब्ध करुन देतात. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना ऑक्सिजन मॅन शाहनवाज शेख (Oxygen Man Shahnawaz Shaikh) म्हणून ओळखू लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार शाहनवाज शेख हे एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देत आहेत. लोकांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी त्यांनी एक 'कंट्रोल रुम' तयार केली आहे. कंट्रोल रुमच्या सहाय्याने ते लोकांना ऑक्सिजन पुरविण्याचे कार्य करतात. जेणेकरुन कोरोना रुग्णांसाठी वेळेमध्ये ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. टीव्ही नाईन मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Mayur Shelke च्या मनाचा मोठेपणा! बक्षिसातील अर्धी रक्कम वांगणी रेल्वे स्थानकात जीव वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार)

शाहनवाज शेख यांच्या मित्राच्या बहिणीला कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. तिच्यावर उपचार सुरु होते. परंतू अंतिम क्षणी तिला ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव करताना तिचा रिक्षात मृत्यू झाला. ही बाब शाहनवाज यांच्या मनाला लागली. त्यामुळे त्यांनी नागरिकांना ऑक्सिजन वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यासाठी भांडवल उभे करण्यासठी त्यांनी स्वत:ची 22 लाख रुपयांची Ford Endeavour कार विकली. त्यातून मिळालेल्या पैशांतून सुरुवातीला 160 ऑक्सिजन सिलिंड विकत घेतले. त्यासोबतच 40 सिलिंड भाडेतत्त्वावर घेतले आणि सेवा सुरु केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 हजार कोरोना संक्रमित गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर दिले आणि त्यांची मदत केली.

शाहनवाज यांनी आपल्या कंट्रोल रुममध्ये एक हेल्पलाईन क्रमांकही सुरु केला आहे. आपल्या सेवेबद्दल सांगताना ते म्हणतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची स्थिती फार वाईट आहे. गेल्या वर्षी ऑक्सिजनसाठी प्रतीदिन 50 ते 60 फोन येत असत. आजघडीला मात्र ऑक्सिजनची मागणी करणारे एका दिवसात 500 ते 600 फोन कॉल्स असतात. आलेल्या कॉल्सपैकी आम्ही केवळ 10 ते 20% लोकांचीच मदत करु शकलो आहोत. ज्या नागरिकांना सिलिंडर घेऊन जाणे शक्य नसते अशा लोकांसाठी आमचे लोक ऑक्सिजन सिलिंडर त्यांना घरपोच करतात. आतापर्यंत सुमारे 4000 लोकांना आपण ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवू शकल्याचेही ते सांगतात.