Mayur Shelke | (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या (Central Railway) वांगणी स्थानकात (Vangani Railway Station) घडलेल्या प्रसंगानंतर मयुर शेळके (Mayur Shelke) हिरो ठरला. त्याचे कामही अगदी हिरोला साजेसे होते. याचे कामाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मयुर शेळके याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र यातील 50% रक्कम प्राण वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे मयुरने सांगितले आणि पुन्हा एकदा कौतुकाने भरलेल्या सर्वांच्या नजरा मयुरकडे वळल्या. केवळ बक्षीस मिळवण्यासाठी त्याने हे काम केलेले नसून यातून त्याच्यातील माणूसकीचे दर्शन झाले. तसंच बक्षिसातील निम्मी रक्कम त्या मुलाला देवून मयूरने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

मला असे कळले की मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे बक्षीसाच्या रक्कमेतील निम्मी रक्कम मी त्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे मयुर शेळके याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

दरम्यान,  'तुझे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत', असं म्हणत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मयुरला फोन करुन त्याच्या नि:स्वार्थीपणाचे आणि धैर्याचे कौतुक केले. यासोबत रेल्वेमंत्री पियुष गोयल सह रेल्वे मंत्रालयानेही मयुरला सलाम ठोकला आहे. त्याचबरोबर सर्वच स्तरातून मुयरीच वाहवा होत आहे.

काय आहे नेमकी घटना?

17 एप्रिल रोजी वांगणी स्थानकावरुन एक अंध आई आपल्या मुलाला घेऊन जात होती. त्यावेळेस 6 वर्षांचा मुलगा प्लॅटफॉमवरुन ट्रॅकवर पडला. त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. अंध आई मुलाला शोधत होती. तर मुलगाही ट्रॅकवरुन कसाबसा उठत होता. हे दृश्य पाहणाऱ्या पाईंटमन मयुर शेळके ने वेगाने ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली. मुलाला उचलून ट्रॅकवर ठेवले आणि पटकन प्लॅटफॉर्मवर चढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रेल्वे मंत्रालयाने या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला.