आपल्या आजूबाजूला असे फार कमी लोक आढळतात ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात. असेच काम केले आहे ते महाराष्ट्राचा पुत्र मयूर शेळके (Mayur Shelke) याने. भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीसमोर आलेल्या एका मुलाला मयूरने धावात जाऊन वाचवले आहे. अक्षरशः अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ असून सध्या तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याबाबत चहुबाजूने मयूरचे कौतुक होत असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही मयूरची पाठ थोपटली आहे. मुख्यमंत्र्यांनी मयूरला फोनकरून त्याचे कौतुक केले आहे.
ही घटना आहे 17 एप्रिलची, जेव्हा एक आई आपल्या लहान मुलासह वांगणी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभी होती. यावेळी तोल जाऊन लहान मुलगा प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावर पडला. त्याचवेळी समोरून ट्रेन येत होती. अगदी सिनेमात दाखवले जाते असे हे चित्र होते. मुलाची प्लॅटफॉर्मवर येण्यासाठीची धडपड आणि एका आईची घालमेल पाहता, मयूर शेळके जीवाच्या आकांताने धावत रुळाकडे गेला व त्याने मुलाला प्लॅटफॉर्मवर सोडले आणि त्यानंतर स्वतः प्लॅटफॉर्मवर उडी मारली. मयूर प्लॅटफॉर्मवर चढत असतानाच रूळावरून रेल्वे गेली. अगदी श्वास रोखायला लावणारे हे दृश्य होते.
.@CMOMaharashtra calls Brave pointsman Mayur Shelke thanking him for saving a child’s life
Mayur starts praising CM on his work in COVID but CM interrupts him. “Thik hai” pic.twitter.com/IPlGdQEnTr
— Ravi Ratan (@scribe_it) April 21, 2021
या घटनेनंतर मयूरच्या साहसाचा डंका चहूदिशेला वाजत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून मयूरचे कौतुक केले आहे. फोनवर मुख्यमंत्री म्हणतात, ‘तुमचा थरारक व्हिडीओ पहिला. माझ्याकडे शब्द नाहीत.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलेत. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील. नीट काळजी घ्या, तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत… कल्पनेच्या पलिकडचे काम केले आहे तुम्ही.’ (हेही वाचा: बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स आता मुंबईत नाकेबंदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या दिमतीला)
या संभाषणामध्ये मयूरने कोरोनाच्या काळात राज्य सरकार करत असलेल्या कामाबद्दलही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, याआधी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही स्वतः मयूरला फोन करून त्याचे कौतुक केले होते. रेल्वेने मयूर शेळकेला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटने मयूरला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. क्लासिक लीजेंड्सचे प्रमुख अनुपम थरेजा यांनी घोषणा केली की, त्यांनी Jawa Heroes Initiative द्वारे मयूरला नवीन Jawa ची गाडी भेट देतील.