School Reopen: राज्यातील कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार
School Reopen | Representative image (PC - Wikimedia Commons)

कोविड-19 ची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध देखील हळूहळू शिथील होत आहेत. यातच आता शाळा-कॉलेज संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पालकांशी चर्चा करुन ठराव करावा लागणार आहे. तसंच विशेष नियमांच्या आधारे शाळा उघण्यात येणार आहेत. (राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालासाठी 30:30:40 नुसार मूल्यमापन होणार, वर्षा गाडकवाड यांची माहिती)

शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्पयाने शाळेत बोलवण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या कोरोना त्रिसुत्री बरोबरच विद्यार्थ्यांनी इतर नियम देखील पाळणे आवश्यक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. तसंच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अशाप्रकारे एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी बसू शकतील. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्याला घरी पाठवण्यात येतील. त्यानंतर लगेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. (11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती)

शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी त्याच गावात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिक्षकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी लागू नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, कालच्या अपडेटनुसार, राज्यात कोरोनाचे 9,336 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 123 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात 1,23,225 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत घट होत असली तरी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.