रजनीदेवी पाटील (Rajni Devi Patil) यांचे निधन झाले आहे. त्या 76 वर्षांच्या होत्या. रजनीदेवी या सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री आहेत. पाठिमागील काही काळापासून त्या प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होत्या. त्यांच्यावर पुणे येथी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवार (12 जानेवारी) दुपारी 1.30 च्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास (Rajni Devi Patil Passes Away) घेतला.
लष्करी कुटुंबात जन्म
सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन येथील जवळपास चार पिढ्यांची लष्करी परंपरा लाभलेल्या बर्गे कुटुंबात 26 जुलै 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला. रजनी देवी यांचा श्रीनिवास पाटील यांच्यासोबत 16 मे 1968 रोजी विवाह झाला. तेव्हापासून जवळपास 57 वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी त्यांनी सहजीवनात एकत्र घालवला. अखेर या सहजीवनाची आज अखेर झाली. सुरुवातीच्या काळात प्रशासकीय अधिकारी असलेल्या आणि पुढे राजकारणात प्रवेशकर्ते झालेल्या पती श्रीनिवास पाटील यांच्या पाठिमागे त्या नेहमीच ठामपणे उभा राहिल्या. खास करुन पाटील यांच्या प्रशासकिय, सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांची साथ मोलाची ठरली. कराड येथील वैकुंठ स्मशानभुमीत सायंकाळी 6.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांचा राजकीय प्रवास घ्या जाणून; सनदी अधिकारी ते राज्यपाल मार्गे पुन्हा खासदार)
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून शोक
रजनीदेवी यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. सातारा येथील भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीदेखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर आपल्या भावना व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांच्या निधनाचे दु:खद वृत्त समजले. आम्ही खासदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. इश्वर त्यांच्या कुटुंबाला दु:खातून बाहेर पडण्याचे बळ देवो. रजनी देवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांची 'मिशी'ची भीती खरी ठरली, विजयानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया)
एक्स पोस्
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. रजनीदेवी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. खासदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराने त्यांना द्यावी, हीच प्रार्थना. सौ. रजनीदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/AXBMwa6FkA
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 12, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवाह यांनी देखील रजनी देवी पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. श्रीनिवास पाटील साहेब यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी रजनीदेवी (७६) यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/NIxfV9tWOc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2024
रजनी देवी या समस्त वर्तुळात माई म्हणून ओळखल्या जात. श्रीनिवास पाटील यांनी राबवलेल्या प्रत्येक उपक्रमात आणि घेतलेल्या निर्णयात माईंचा सहभाग महत्त्वाचा असे. त्या एक आदर्श आणि सुसंस्कृत गृहिणी म्हणून नेहमीच ओळखल्या जात. त्या स्वत:ही उच्चशिक्षीत होत्या. प्रशासकीय अधिकारी, खासदार, राज्यपाल अशा विविध मोठमोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची पत्नी म्हणून वावरताना त्यांनी नेहमीच जुन्या रूढी परंपरा, संस्कृती, संकेत जपण्याचा त्यांचा प्रयत्न केला. सर्वांशी प्रेमाने राहणे. आल्यागेल्यांची आपूलकीने आणि आस्थेने चौकशी करणे, असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.