Srinivas Patil with Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Shriniwas Patil Political Journey: सातारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन व्यक्तिमत्वांची जोरदार चर्चा आहे. एक उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil). गेली अनेक वर्षे साताऱ्यातील जनतेच्या मनावर अधिकाराज्य गाजवणारे उदनयनराजे पराभूत होतील, असे भल्याभल्यांनाही वाटत नव्हते. पण, शरद पवार या किमयागाराच्या साथिने श्रीनिवास पाटील यांनी हे करुन दाखवले. त्यामुळे आजची तरुणाई आणि राजकारणाच्या चर्चांमध्ये फारसा रस नसणाऱ्या अनेकांना प्रश्न पडला आहे की श्रीनिवास पाटील नेमके आहेत कोण? जाणून घेऊया.

व्यासपीठावर बोलायला उभे राहिले की ज्यांचा आवाज आणि भाषा ऐकून साताऱ्याच्या रांगड्या भाषेची ओळख होते. ते म्हणजे श्रीनिवास पाटील. कराड जिल्ह्यात असलेल्या पाटण तालुक्यातील मारुल हवेली इथं शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे आयएएस अधिकारी, खासदार आणि एका राज्याचा राज्यपाल होईल असे कोणालाही वाटले नव्हते. श्रीनिवास पाटील यांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना लहानपणीच क्रांतिसिह नाना पाटील यांचा सहवास जवळून लाभला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच गेले. मात्र पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. पुण्यात त्यांचा यशवंतराव चव्हाण,धनंजयराव गाडगीळ यांसारख्या दिग्गजांशी जवळून संबंध आला. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांची 'मिशी'ची भीती खरी ठरली, विजयानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया)

Srinivas Patil | (Photo Credits: Facebook)

शिक्षण संपल्यानंतर श्रीनिवास पाटील सनदी सेवेत गेले. तब्बल 30 वर्षे सनदी सेवेत काढल्यानंतर श्रीनिवास पाटील हे अचानक राजकारणात आले. खरं म्हणजे ते हाडाचे राजकारणी नाहीत. शरद पवार यांच्या मैत्रीपर्वातून ते राजकारणात आले. विशेष म्हणजे त्यांचा पहिला सामना हा कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झाला. त्यावेळी कराड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे राष्ट्रवादीकडून केवळ शरद पवार यांच्या आग्रहाखातर मैदानात उतरलेल्या श्रीनिवास पाटील यांचा निभाव लागणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पण, आपल्या रांगड्या भाषेत श्रीनिवास पाटील यांनी घातलेली साद मतदारांना भावली. श्रीनिवास पाटील विजयी झाले.

खासदार म्हणून दोन वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केल्यावर श्रीनिवास पाटील हे सिक्कीम राज्याचे राज्यपाल झाले. श्रीनिवास पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा अत्यंत रांगडी असली तरी, त्यात जिव्हाळा असतो. बोलण्याची पद्धती कमालीची ठसकेबाज पण संयत. कधीही कोणावर पातळी सोडून टीका नाही. बोलण्यातला मश्किलपणाही असा की, समोरचा प्रेमात पडेल. अशा या श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मैदानात उतरवले.

उदनयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील हा सामना चांगलाच रंगला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडूण आलेल्या उदनयनराजे भोसले यांनी धक्कादायकरित्या आपल्या पदाचा आणि रष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. उदनयनराजे भोसले यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. दुसऱ्या बाजूला भाजपनेही उदनयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाचे जोरदार राजकीय भांडवल केले. तसेच, ही निवडणूक प्रतिष्ठेचीही केली. त्यामुळे या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीत अखेर श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला. उदयनराजे भोसले यांचा पराभव सातारा आणि राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहील हे नक्की.