
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Scam Case) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाला आहे. तब्बल 100 दिवसांनतर संजय राऊत कारागृहाबाहेर पडले आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्या सुटकेच्या एका दिवसानंतर गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले, तसेच लवकरच ते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, नवीन सरकारच्या काही निर्णयांचे मी स्वागत करतो. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. फक्त विरोध करण्यासाठी आम्ही विरोध करणार नाही, आम्ही असे कधीच केले नाही. काही सार्वजनिक कामांच्या संदर्भात लवकरच फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ते पुढे म्हणाले, राज्यातील राजकीय कटुता संपली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दांचे मी स्वागत करतो. राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय केवळ उपमुख्यमंत्री घेत आहेत. त्यांनी घेतलेले काही निर्णय कौतुकास्पद आहेत. फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचे राऊत म्हणाले. (हेही वाचा: Sanjay Raut Meets Sharad Pawar: संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट)
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय कटुता वाढली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे ती काढण्याची गरज आहे. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'नेही फडणवीस यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात राऊत म्हणाले की, मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटून तुरुंगात त्यांच्यासोबत काय झाले ते सांगेन. गेल्या काही वर्षांत राजकारणाची पातळी घसरल्याचे राऊत म्हणाले. ते खासदार आहेत आणि त्यांचा भाऊ आमदार आहे. अशा स्थितीत त्यांना नेत्यांना भेटण्याचा अधिकार आहे. अमित शहा हे कोणत्याही पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत. कारागृहातील अनुभवांबद्दल संजय राऊत म्हणाले, तुरुंगात राहणे सोपे नाही. तुरुंगातील भिंतींशी बोलावे लागते. एकटेपणा खाऊन टाकतो. माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्यांनी मला अटक करण्याचा कट रचला आणि त्यातून त्यांना आनंद मिळाला, तर मीही त्यांच्या आनंदात सहभागी आहे. मला देशातील कोणत्याही तपास यंत्रणेवर भाष्य करायचे नाही आणि मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. पत्रा चाळ घोटाळ्यात मनी लाँड्रिंग अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केलेले संजय राऊत 101 दिवसांनंतर मंगळवारी (8 नोव्हेंबर 2022) जामिनावर बाहेर आले.