
Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याच्या प्रत्यार्पणाबाबत देशभर चर्चा सुरू आहे. यावर देशभरातील राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तहव्वुर राणाला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बिहार निवडणुकीदरम्यान सरकार तहव्वुर राणाला फाशी देईल असा दावाही त्यांनी केला. तसेच बिहार निवडणुकीपर्यंत तेहव्वूर राणा यांची चर्चा सुरू राहील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कोणालाही श्रेय घेण्याची गरज नाही -
संजय राऊत यांनी पुढे बोलताना सांगितले की, तहव्वुर राणाला भारतात आणण्यासाठी 16 वर्षे लागली. काँग्रेसच्या राजवटीत त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे राणाला परत आणण्याचे श्रेय कोणीही घेऊ नये. तहव्वुर राणा हा भारतात प्रत्यार्पण केलेला पहिला आरोपी नाही. यापूर्वी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमलाही भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. (हेही वाचा - Tahawwur Rana Aarrested by NIA: भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर तहव्वुर राणाला एनआयएकडून अटक; पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार)
हे सरकारचे मोठे यश नाही - कन्हैया कुमार
संजय राऊत यांच्यापूर्वी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीही तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की तहव्वुरचे प्रत्यार्पण हे राजनैतिक यश नाही, तर सार्वजनिक मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची ही एक युक्ती आहे. (हेही वाचा - Tahawwur Rana Extradition Cleared: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून Tahawwur Hussain Rana च्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी)
तहव्वुर राणाला गुरुवारी संध्याकाळी भारतात आणण्यात आले. राणाला विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आले. न्यायालयाने राणाला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. आज एनआयए राणाची चौकशी करणार असून मुंबई हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारणार आहे.