Sanjay Raut

अंधेरी पोट निवडणूकीमध्ये आज राजकीय घडामोडींनी ट्विस्ट आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आणि शरद पवार यांच्याकडूनही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं होतं. या पत्रानंतर 24 तासांत अनेक चक्रं फिरली आणि आज अखेर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने उमेदवारी मागे घेतली. दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, 'राज ठाकरेंचं भाजपाला पत्र हे स्क्रिप्टेड' असल्याचं म्हटलं आहे. अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये ऋतुजा लटकेचं विजयी होणार होत्या असं त्यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत सध्या पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत आहेत. आर्थर रोड जेल मध्ये त्यांना ठेवलं असून 31 जुलै दिवशी त्यांच्यावर ईडीने पीएमएलए अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असता कोर्टात सादर केले होते. यावेळी मीडीयाशी मधल्या वेळेत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा: Sushma Andhare: राज ठाकरेंचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट, शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंचा भाजपसह मनसेला खोचक टोला .

बाळा नंदगावकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या जामीनावरील आजची सुनावणी आता उद्यावर गेली आहे. राऊतांकडून त्यांच्या जमीनावर सुनावणी घेताना ईडीला हवे असल्यास तपास सुरू ठेवावा पण त्यासाठी त्यांना तुरूंगात ठेवण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबई मध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता अशा निवडणूका बिनविरोध केल्या जातात. त्यामुळे भाजपाने उमेदवारी मागे घेऊन परंपरा कायम ठेवावी असं राज ठाकरेंनी आवाहन केले होते. राज ठाकरे आणि रमेश लटके यांचे जुने संबंध होते. राज ठाकरेंनी रमेश लटकेंना शाखाप्रमुख केले होते त्यामुळे केवळ त्याच्या मैत्रीतून हे पत्र लिहलं असल्याचं काल राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.