Sanitizer Blast in Kolhapur: कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू
Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Sanitizer Blast in Kolhapur: कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग होऊ नये, म्हणून वापरण्यात येणारे सॅनिटायझर (Sanitizer) घातक ठरू शकते. त्यामुळे सॅनिटाझर हाताळताना योग्य काळजी घेण गरजेचं आहे. कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटाझटराचा स्फोट (Sanitizer Blast) झाल्याने होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात या स्फोटात ही महिला जखमी झाली होती. त्यानंतर आज या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या स्फोटात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सुनीता काशीद असं आहे. 27 डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात ही दुर्दैवी घटना घडली होती. प्राप्त माहितीनुसार, सुनीता काशीद आठ दिवसांपूर्वी घरातील कचरा पेटवत होत्या. या कचऱ्यात सॅनिटायझरची अर्धवट संपलेली बॉटलही होती. कचरा जाळताना अचानक सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. (हेही वाचा - Mumbai COVID-19 Death Cases: मुंबईत कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी मृत्यूदर पाहून BMC आयुक्तांनी कोविड योद्धांसह जनतेचे केले अभिनंदन)

या स्फोटात सुनीता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुनीता यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे बोरवडे भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्यात सॅनिटाझर स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझेशन करताना अचानक स्फोट झाल्याने एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रजबीया शेख असं या मृत महिलेचं नाव होतं.