औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेनंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका जुन्या प्रकरणात सांगली (Sangli) येथील शिराळा कोर्टाने (Shirala Court) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात कोर्टाने पाठीमागील महिन्यातच वॉरंट काढले आहे. मात्र, असे असूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आता थेट अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार राज ठाकरे यांना बजावण्यात आलेले वॉरंट हे 2012 मधील एका प्रकरणाशी संबंधीत आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल आहे. पाठीमागील अनेक वर्षे हा खटला प्रलंबीत आहे आता अचानक हा खटला पुन्हा वेग धारण करतो आहे. (हेही वाचा, Shiv Sena on MNS and BJP: देवेंद्र फडणवीस 'मिष्टर इंडिया' तर राज ठाकरे 'भाजपचे उपवस्त्र', शिवसेनेचे जोरदार टीकास्त्र)
प्रलंबीत खटले निकाली काढण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरीलही खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मनसेने 2012 मध्ये मराठीचा मुद्दा घेऊन दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत जोरदार आंदोलन केले होते. या वेळी काही दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठीही जबरदस्ती करण्यात आली होती. त्यामुळे तानाजी सावंत आणि मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.