सांगली-कुपवाड- मिरज महापालिका (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. विद्यमान महापौर गीता सुतार यांच्या कार्यकाळाची मुदत येत्या 21 फेब्रुवारीला समाप्त होत आहे. त्यामुळे खुले होत असलेल्या महापौर पदासाठी (Sangli Mayor Election) सर्वच पक्षातून विविध मंडळी इच्छुक आहेत. सत्ताबळाचा विचार करायचा तर सांगली महापालिकेवरभाजपचा झेंडा आहे. तरीही संख्याबळ आणि मतांची जुळवाजुळव अशी आखणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर पदासाठी गळ टाकला आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या निमित्ताने सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली मुक्कामावर भर दिला आहे.
सांगली महापालिका पक्षीय बलाबल
- भाजप + अपक्ष- 43
- काँग्रेस- 19
- राष्ट्रवादी काँग्रेस- 15
महापौर पदासाठी भाजपतील इच्छुक नावे
स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धिरज सूर्यवंशी, निरंजन आवटी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महापौर पदासाठ इच्छुक नावे
मेनुद्दीन बागवान, दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महापौर पदासाठी फिल्डींग लावली असली तकरी काँग्रेस हा महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेते याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्ष नेते पदावर असलेले उत्तम साखळकर हे महापौर पदासाठी इच्छुक आहेत. तर नगरसेवक मंगश चव्हाण हेही काँग्रेसमधून जोरदार दावेदार मानले जात आहेत. त्यातच सांगली काँग्रेसमधील विश्वजीत कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील यांच्या गटांची भूमिका काय राहते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, सांगली मधील आटपाडीतील जनावरांच्या बाजारात तब्बल 1.50 कोटी रुपयांचा मोदी बकरा विक्रीस)
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगतील दाखल झाल्याचे वृत्त आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात वेगवेगळ्या बैठका पार पडणार असून, महापौर पदाबाबत खलबतं होणार असल्याची चर्चा आहे.