राज ठाकरे यांच्या पक्षातील संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; जाणून घ्या त्यामागचं कारण
Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मण सेना पक्षाचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिली आहे.

सरकारी कामात अडथळे आणणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणणे या गुन्ह्यानंतर्गत त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने दिवाळीनिमित्त दादर व माहीम परिसरात शुभेच्छा देणारे कंदील लावले होते. तसेच त्या कंदिलांवर राज ठाकरे यांचा फोटोही होता. मात्र त्यावर महापालिकेने कारवाई करत ते कंदील तिथून हटवून कचऱ्यात टाकले. त्यावरून संदीप देशपांडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.

संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 दिलेल्या माहितीनुसार, "मनसे दरवर्षी हे कंदिल लावतात आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली. ते सर्व कंदिल काढले."

"यावेळी मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का?" असा खडा सवालही संदीप यांनी केला.

इतकंच नव्हे तर मनसेला टार्गेट केलं जात असल्याचा संदीप यांनी आरोप केला. ते म्हणाले "हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही, असा मनसे स्टाईल इशाराही त्यांनी दिला."

महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू, सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला सुचक इशारा

संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं आहे.