छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत राज ठाकरे यांचा दावा चुकीचा; खासदार छत्रपती संभाजीराजे
Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे दिवशी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये जाहीर सभेत 'छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरी समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली' असं वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान शिवरायांचे वंशज आणि खासदार  संभाजी छत्रपती यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला फेटाळत फटकारलं आहे. हे देखील नक्की वाचा: Raj Thackeray Aurangabad Rally: राज ठाकरे घेणार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर सभा; औरंगाबादच्या सभेत घोषणा .

आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संभाजीराजेंनी दिलेल्या माहितीनुसार, 'जबाबदार व्यक्तींनी इतिहासाबद्दल तथ्यहीन वक्तव्य करू नयेत. लोकमान्य टिळक यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हा दावा चुकीचा आहे. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्यानंतर पूजा सुरू झाली. पुढे 1925 मध्ये समाधी बांधण्यात आली आहे. शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेतील खासदारकी लवकरच संपणार आहे. पुढे त्यांची वाटचाल कशी असेल याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत बोलताना 6 मे दिवशी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबई किंवा पुण्यात लोकांसमोर आगामी राजकीय भूमिका काय असणार, याबाबतची घोषणा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी अनधिकृत भोंग्यांना उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. जर मशिदीवर भोंगे वाजले तर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत.