Sambhaji Bidi’s Name Will Be Changed: शिवप्रेमीच्या लढ्याला अखेर यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीने घेतला निर्णय
Sambhaji Bidi’s (PC - youtube)

Sambhaji Bidi’s Name Will Be Changed: गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्यात तसेच राज्याबाहेर बिडी विकली जात आहे. या विरोधात राज्यातील शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव बदलावे, यासाठी शिवप्रेमींनी, संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. आज अखेर शिवभक्तांच्या या आंदोलनाला यश आले आहे.

संभाजी बिडीचे उत्पादन करणारी साबळे वाघिरे कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीने एक प्रसिद्धीपत्रकदेखील काढलं आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत)

बिडीचं नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचंदेखील कंपनीने पत्रकात स्पष्ट केलं आहे. साबळे वाघिरे कंपनी आपल्या उत्पादनाला नवीन नाव देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे, असंही संजय वाघिरे यांनी सांगितलं आहे.

यापूर्वी अनेक नेत्यांनी संबंधित बिडी उत्पादनाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी उचलून धरली होती. छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाने असलेल्या बिडीला भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. बिडीला संभाजी राजेंचं नाव देण्याचं धाडस महाराष्ट्रात होतं, इथेचं आपण कमी पडलो,' अशी खंत नीतेश राणे यांनी व्यक्त केली होती. याशिवाय राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनीदेखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत, कंपनीने तात्काळ उत्पादनाचे नाव बदलावे, असं आवाहन केलं होतं.