Sachin Vaze on Anil Deshmukh: 'अनिल देशमुख यांनी कधीच वसुलीचे टार्गेट दिले नाही', सचिन वाझे यांच्या उत्तरामुळे 'कहानी में ट्विस्ट'
Sachin Vaze, Anil Deshmuk | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अँटिलिया स्फोटक प्रकरण, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केलेले 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप या सर्व प्रकरणांमध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाच्या सुरु असलेल्या एकसदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीसमोर सचिन वाझे यांनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 'तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुंख यांनी कधीही वसुलीचे टार्गेट दिले नव्हते. तसेच, बारमालक किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाही व्यक्तीकडून आपण कधीही पैसे घेतले नाहीत', असा दावा वाझे यांनी उत्तरादाखल केला आहे. वाझे यांच्या उत्तरामुळे या प्रकरणात 'कहानी में ट्विस्ट' आल्याची चर्चा रंगली आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल (Chandiwal Commission) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप एका पत्रद्वारे केला होता. परमबीर यांच्या आरोपांतील सत्यता ही समिती तपासून पाहात आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार सीताराम कुंटे यांचा ईडीने नोंदवला जबाब)

सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर चौकशीदरम्यानस सांगितले की, 'तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुंख यांनी कधीही वसुलीचे टार्गेट दिले नव्हते. तसेच, बारमालक किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाही व्यक्तीकडून आपण कधीही पैसे घेतले नाहीत.' फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. आपल्याला गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आल्याचा दावा सचिन वाझे यांनी चौकशीदरम्यान केला. तसेच, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांहीही आपल्याकडे कधीही आर्थिक मागणी केली नाही. पालांडे व आपण अधिकृत कारणांसाठी एकच वेळ भेटलो असल्याचेही, वाझे यांनी या आधी एका साक्षीदरम्यान म्हटले होते.