सचिन अहिर (PC - facebook)

सचिन अहिर (Sachin Ahir) यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकाअगोदर सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवधनुष्य हाती घेतले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करताल असा मला विश्वास आहे.’ असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. तसेच सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला रिट्वीट करत ‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, सचिन अहिर यांनी मागील वर्षी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. अहिर यांच्या पक्षांतराचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी सचिन अहिर यांनी शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही. मात्र शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असं स्पष्ट मत मांडलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा आहे.

सचिन अहिर यांनी जुलै 2019 मध्ये राष्ट्वादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता.1999 मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार झाले होते. अहिर यांना त्यांचे मामा अरुण गवळी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं होतं. अहिर यांनी 2009 मध्ये गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसने सचिन अहिर यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, 2019 मध्ये अहिर यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. परंतु, आता अहिर यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे.