विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Row) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्षाकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. अजित पवार यांना भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार लक्ष्य केले जात असतानाच शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामना संपादकीयातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका (Saamana Editorial On Ajit Pawar Row) व्यक्त करण्यात आली आहे. सामना संपादकीयातून छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याद्दल राज्यपालांनी काढलेल्या उद्गारांवरुन भाजपला लक्ष करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात, असा टोलाही सामनातून लागावण्यात आला आहे.
दैनिक सामना संपादकीयात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? (हेही वाचा, Ajit Pawar On Devendra Fadnavis: अजित पवारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल, केले 'असे' वक्तव्य)
सामना संपादकीयात पुढे म्हटले आहे की, संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही. मात्र यावरून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ‘‘राज्यपाल, तारतम्य बाळगा!’’ असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते?, असा सवालही संपादकीयातून उपस्थित करण्यात आला आहे.