CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 26 मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे. या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल. तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये पार पडणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यंदा भारत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, ज्येष्ठ साहित्यिक जयंत नारळीकर यांच्या नावानंतर सासणे यांचे नाव मागे पडले. मागील साहित्य संमेलनादरम्यानदेखील भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. (वाचा - 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आनंद)

दरम्यान, 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे. यावर्षी नारळीकर यांच्या रुपाने पहिल्यांदाचं विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कोरोना विषाणूच्या सावटामुळे यंदा साहित्य संमेलन होणार की, नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असल्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी सांगितलं आहे.