Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथे फ्लॅट वाटपाच्या बहाण्याने लोकांची एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रातील नाशिकमधून (Nashik) कुख्यात भूमाफिया आणि आंतरराज्यीय फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. पियुष तिवारी (42) उर्फ पुनीत भारद्वाज असे या आरोपीचे नाव असून, त्याला 2018 मध्ये फसवणूक प्रकरणात गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते आणि त्याच्यावर 50,000 रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी म्हणाले, 20 मार्च रोजी सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, 50,000 रुपयांचे बक्षीस असलेला पीयूष तिवारी नावाचा एक घोषित गुन्हेगार नाशिक, महाराष्ट्र येथे कुठेतरी राहत आहे. या माहितीच्या आधारे कारवाई करत, पोलीस पथक तयार करण्यात आले. पथकाने याबाबत अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आरोपी नाशिक येथे राहत असून तो फूड चेनचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. पथकाने छापा टाकून आरोपीला पकडले.

चौकशीदरम्यान, त्याने खुलासा केला की त्याने 2011 मध्ये बिल्डर म्हणून व्यवसाय सुरू केला होता आणि 2018 पर्यंत 15-20 शेल कंपन्यांसह आठ कंपन्या तयार केल्या होत्या. 2016 मध्ये त्याच्या घरावर आयकर छापा टाकून सुमारे 120 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. पुढे डीएसपी म्हणाले, ‘ आरोपी पियुषचा बिल्डर म्हणून व्यवसाय कोलमडल्यानंतर त्याने मार्केटमध्ये पुन्हा उभे राहण्यासाठी, अनेक खरेदीदारांना एकच फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली.’ (हेही वाचा: RK College चे प्रोफेसर Sanjay Dubey ला अटक; B.Pharma साठी अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या अमिषावर लुटले दीड लाख)

या फसवणूकप्रकरणी आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याने दिल्लीतून पळ काढला आणि बनावट नावाने आपला अड्डा दक्षिण भारतात हलवून इतर विविध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आता त्याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 406, 409, 420, 120 बी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व पुढील तपास सुरु आहे.