
पुण्यातील (Pune) जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये कांदळी (Kandali) गावात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंदळी अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर आज दुपारी दीडच्या सुमारास हा दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी अंदाजे अडीज लाख रक्कम लुटली आहे तर गोळीबारात पतसंस्थेतील व्यवस्थापक राजेंद्र भोर हे गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू देखील झाला आहे.
TV9 Marathi च्या रिपोर्ट्सनुसार, राजेंद्र भोर व क्लार्क अंकिता नेहरकर दुपारी जेवणासाठी एकत्र बसले होते. दोन अज्ञात व्यक्ती पतसंस्थेत हेल्मेट घालून आले. त्या दोघांनी व्यवस्थापक भोर यांच्याकडे पैसे मागितले. भोर यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी भोर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर धाक दाखवत त्यांनी अडीच लाखांची रक्कम घेऊन पळ काढला. पतसंस्थेतील सीसीटीव्हीमध्ये दोन्ही दरोडेखोर कैद झाले आहेत. नक्की वाचा: Pune: बँक दरोडा प्रकरणात 5 जणांना अटक; 2.2 कोटी रुपयांच्या मालमत्तेची वसुली .
पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्यानंतर तात्काळ डॉग स्क्वाड तेथे पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यात आला. अशाप्रकारे भर दिवसा दरोडा पडल्याने नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारचा दरोडा शिरूर मध्ये एका बॅंकेतही घालण्यात आला होता. त्यामुळे ही पुण्यातील दुसरी घटना आहे.