महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची विजयी माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा सद्य घडीचा बहुचर्चित प्रश्न ठरत आहे. याचे उत्तर आपल्याला येत्या 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) निकालामध्ये मिळेलच. तत्पूर्वी राज्यात 288 मतदारसंघांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचाराची तयारी केली आहे. या निमित्ताने राज्यातील कोकण किनारपट्टीवरील प्रमुख जिल्हा रत्नागिरीचा (Ratnagiri) आढावा सादर करत आहोत. रत्नागिरी मध्ये एकूण 5 मतदारसंघ असून यामध्ये दापोली (Dapoli), गुहाघर (Guhaghar), चिपळूण (Chiplun), राजापूर (Rajapur) आणि मूळ रत्नागिरी या ठिकाणांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारीनुसार, याठिकाणी युतीच्या सर्व जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत, तर विरोधासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष उमेदवार सज्ज आहेत तसेच मनसे कडून देखील राजापूर मतदारसंघात निवडणूक लढवण्यात येणार आहे. येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमिवर या पाच मतदारसंघातील काही महत्वाच्या लढती आणि मागील वर्षीचे निकाल जाणून घेऊयात..
दापोली विधानसभा मतदारसंघ
मागील निवडणुकीत दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांचा 32% मते मिळवून विजय झाला होता. तर त्यापूर्वी या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती. यावेळेस आमदारकी राखून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने विद्यमान आमदार संजय कदम यांनाच उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे योगेश कदम आणि अपक्ष उमेदवार प्रवीण मर्चंड उभे आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघ
2014 च्या निवडणुकीत गुहाघर येथून राष्ट्रवादीला विजय मिळवून भास्कर जाधव यांना यश आले होते. मात्र यंदा निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश घेतला. जाधव यांची संबंधित मतदारसंघात असलेली ओळख लक्षात घेऊन सेनेने सुद्धा त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर आपल्या पूर्व उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने सहदेव बेटकर यांना रिंगणात उतरवले आहे. यंदा ही दुहेरी लढत असेल.
चिपळूण विधानसभा मतदारसंघ
शिवसेनेचे सदानंद चव्हाण हे चिपळूण मध्ये सलग दोन वेळा निवडून आलेले उमेदवार यंदा सुद्धा सेनेकडूनच निवडणुकीत उभे आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि अपक्ष म्हणून सचिन मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपा या चार प्रमुख पक्षात टक्कर होती तर यंदा सेना व राष्ट्रवादी हे दोनच प्रबळ पक्ष लढणार आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
रत्नागिरी जिल्हयातील हा मूळ शहरात येणारा मतदारसंघ आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये याठिकाणी उमेदवार जरी सारखाच असला तरी सत्ताधारी पक्ष बदलला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांना यंदा देखील सेनेच्या तिकिटावर लढता येणार आहे. तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर आणि अपक्ष उमेदवार राजेश जाधव उभे आहेत.
राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजापूर येथे मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेचे राजन साळवी यांची आमदारकी कायम आहे. त्यामुळे यंदा सुद्धा साळवी आणि परिणामी सेनेचा पगडा भारी आहे. या विजयी घोडदौडीला थांबवण्यासाठी काँग्रेस कडून अविनाश लाड आणि मनसे कडून अविनाश सोंडाळकर हे उमेदवार प्रयत्नात आहेत. पाहायला गेल्यास संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून केवळ याच मतदारसंघात काँग्रेस व मनसेकडून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, 2009 ते 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिल्यास, यामध्ये मतदानाचा टक्का बऱ्याच अंशी घसरल्याचे दिसून येते. म्ह्णूनच हे प्रमाण पुन्हा स्थिर करण्यासाठी रत्नागिरी मध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, आता याचे नेमके परिणाम मतदानाच्या दिवशीच समोर येतील.