Navneet-Ravi Rana Arrest: राणा दाम्पत्याला अटक; दोघांना आजची रात्र पोलिस ठाण्यात घालवावी लागणार
MP Navneet Rana, MLA Ravi Rana (PC - ANI)

Navneet-Ravi Rana Arrest: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शिवसेना कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांनी या मुद्द्यावर भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. दोघांना उद्या, रविवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी शनिवारी प्रचंड गदारोळानंतर रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचे निवास्तान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतला. हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून आज तो नाट्यमयरित्या संपुष्टात आला आहे. सकाळी नऊ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या मूडमध्ये होते. या घोषणेने संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळी राणा दाम्पत्याच्या अमरावती आणि मुंबईतील निवासस्थानी पोहोचून गोंधळ घातला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. बॅरिकेडिंग तोडण्यात आले. बराच वेळ शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभे होते. अखेर राणा दाम्पत्याला आपला कार्यक्रम मागे घ्यावा लागला. (हेही वाचा - Sanjay Raut Criticizes BJP: नवनीत आणि रवी राणा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत; भाजपने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय - संजय राऊत)

शिवसैनिकांच्या तक्रारीवरून अटक -

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसैनिकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मातोश्री (उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) हे त्यांच्यासाठी मंदिरासारखे आहे. त्यामुळे या दोघांनी मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा करणे म्हणजे भावना दुखावल्यासारखे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कलम 153 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचून दोघांनाही खार पोलीस ठाण्यात नेले. दोघांची चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी अटक केल्याची पुष्टी केली. दोघांना उद्या, रविवारी वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी खासदार असून त्यांचे पती आमदार आहेत. दोघेही देशाचे प्रतिनिधी आहेत. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांचे त्यांच्यासोबतचे वागणे निषेधार्ह आहे. नवनीत राणा यांनी भाजप आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे.