Ramdas Athawale | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद (Akash Anand) यांनी संघटनेतील सर्व पदांवरुन मुक्तता करत पक्षातून हटवले आहे. या कारवाईस काहीच तास उलटत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी त्यांना आपल्या पक्षात यावे यासाठी खास निमंत्रण दिले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आठवले यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी आकाश आनंद यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात व्हावे. त्यांच्या उपस्थितीमुळे पक्ष आणि संघटनेला बळ मिळेल, विशेषतः उत्तर प्रदेश राज्यात पक्षाची स्थिती भक्कम होईल. दरम्यान, खरोखरच हे निमंत्रण स्वीकारुन आनंद आरपीआय (A) मध्ये सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता आहे. आनंद यांनी मात्र याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.

पक्षविरोधी कारवाईमुळे कारवाई

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. आनंद यांच्यावरील कारवाई ही बसपातील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. याचे कारण ते मायावती यांचे पुतणे आहेत. पाठिमागच्या काहीच महिन्यांमध्ये त्यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, अलिकडील काळात त्यांनी त्यांचे सासरे डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेतले आणि संघटनेत काम केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. उल्लेखनीय असे की, डॉ. अशोक सिद्धार्थ हे सुद्धा पूर्वी बसपममध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांनाही पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून काढून टाकण्यात आले होते. (हेही वाचा, Akash Anand Political Journey And Career: आकाश आनंद राजकीय प्रवास, वय, शिक्षण आणि कारकीर्द; घ्या जाणून)

आकाश आनंद यांना ऑफर देताना रामदास आठवले

रामदास आठवले यांनी आकाश आनंद यांना आरपीआय (आठवले गट) मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतानाच अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, यादव यांची राजकीय भूमिका काळानुसार बदलली आहे. त्यांनी स्वतः महाकुंभ महोत्सवात सहभागी होऊनही त्याबद्दल केलेल्या भाष्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला आणि म्हटले की ते कुंभमेळ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांना हिंदू मते हवी आहेत पण त्यांनी कुंभमेळ्याकडे दुर्लक्ष केले. जर त्यांनी भेट दिली असती तर योगी आदित्यनाथ सरकारने त्यांना पूर्ण सुविधा पुरवल्या असत्या, असेही ते पुढे म्हणाले.