शरद पवार यांना ऑफर; 'आमच्यासोबत या उपपंतप्रधान व्हा!'
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

विरोधात असलेल्या काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक उमेदवार आहेत. पण, भाजपप्रणीत आघाडीत तसे नाही. भाजपकडे पंतप्रधान पदासाठी मोदी एकटेच आहेत. त्यामुळे शरद पवार हे जर भाजपच्या आघाडीत आले तर, त्यांना उपपंतप्रधानपद मिळू शकते, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी आणि शरद पवार एकमेकांना पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे पवार यानी भाजप आघाडीत सहभागी व्हावे, असे आठवले यांनी म्हटले आहे. वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केले.

दरम्यान, ओवेसी यांचा एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांना भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीचा महाराष्ट्रातील राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा आदरच करतो. पण, ते जर आमच्या टीममध्ये आले तर, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करु, असेही आठवले यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, भाजप सरकारच्या काळात संविधान धोक्यात असल्याचा आरोप करण्यात येतो. या प्रश्नवर आठवले म्हणाले, काँग्रेसने संविधान वाचवण्याची भाषा करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाचवावा. संविधान जाळल्याने ते धोक्यात येऊ शकेल इतके ते कमजोर नाही. संविधान वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे काँग्रेसने ती चिंता करु नये, असेही आठवले या वेळी म्हणाले.