Ram Satpute Assets: ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणे! गलेलठ्ठ श्रीमंत आमदारसाहेबांनी भरला खासदारकीसाठी अर्ज
Ram Satpute Assets | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2024: ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणत आपल्या तत्कालीन गरीबीचे जाहीर प्रदर्शन करणारे भाजप आमदार राम सातपुते यांची संपत्ती (Ram Satpute Assets) पुढे आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या विवरणानुसार आमदार सातपुते हे कोणी गरीब वगैरे नसून चांगले गलेलठ्ठ श्रीमंत आहेत. त्यांच्याकडेही कोट्यवधी रुपयांची संपत्ती, बंगला, सोने-नाणे अशी स्थावर आणि जंगम स्वरुपातील संपत्ती असल्याचे पुढे आले आहे. जाणून घ्या आमदार राम सातपुते यांची एकूण संपत्ती.

राम सातपुते यांची संपत्ती

  • एकूण संपत्ती- सुमारे 92 लाख
  • सोने- 16 तोळे
  • तीन दुचाकी- बुलेट आणि इतर दोन दुचाकी
  • जंगम मालमत्ता- 13,13,000 रुपये
  • पत्नीची मालमत्ता- 24, 30,000 रुपये
  • 14 लाख रुपयांची शेती
  • 41 लाख रुपयांचे घर

संपत्तीत 19 लाखांची वाढ

राम सातपुतेराम सातपुते यांनी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाही अर्जासोबत संपत्तीचा तपशील दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, त्यांच्याकडे 5 लाख 25 हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यांच्या पत्नीकडे 5 लाख 9 हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यानुसार आमदार सातपुते यांच्या संपत्तीमध्ये एकण 19 लाख रुपयांची वाढ झाल्याचे पुढे येत. दरम्यान, प्राप्त माहतीनुसार, सातपुते यांच्याकड शेती आणि पत्नीच्या नावे किराणा व भुसार मालाचे दुकान आहे. (हेही वाचा, Ram Satpute Vs Praniti Shinde: काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पत्र, भाजप Candidate राम सातपुते यांच्याकडून 'जय श्रीराम' म्हणत प्रत्युत्तर)

आमदार राम सातपुते आणि आमदार  प्रणिती शिंदे  यांच्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात सामना होतो आहे. सातपुते हे भाजपच्या कमळ तर शिंदे या काँग्रेस पक्षाच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोघेही राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक अर्ज दाखल होण्यापूर्वीच दोघांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शनपूर्वक निवडणूक प्रचार केला जात होता. आता त्यात आणखी रंगत येईल. दरम्यान, आपण ऊसतोड कामगाराचा मुलगा आहोत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला होता. दरम्यान, सातपूते यांची सपत्ती निवडणूक अर्जासोबत पुढे आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या बाजूला ऊसतोड कामगाराचा मुलगा गरीब नव्हे तर चांगलाच श्रीमंत आहे. त्यामुळे उगाच त्यांनी आपल्या गरीबीचे प्रदर्शन करु नये, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.