शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर (Rajapur) मधील आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना पुन्हा एसीबी (ACB) चौकशीची आज नोटीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज त्यांना कुटुंबासह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारीनंतर आता त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे.
राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी 1 च्या सुमारास ते रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर होतील. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर जारी निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण चौकशीला सामोरे जाणार आहेत.
राजन साळवींवर आरोप काय?
आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून आतापर्यंत 7-8 वेळा चौकशी झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत मागील 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118% जास्त असल्याचा आरोप आहे.
एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी राजन साळवी या6ना अलिबाग कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावलेली होती. दरम्यान राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंतांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राजापूर दौर्यावर असताना त्यांनी आपण कितीही चौकशी, अटक झाली तरीही कायम उद्धव ठाकरेंची साथ निभावणार असल्याचं म्हणाले आहेत.