बाळासाहेबांच्या शिवसेनेत आयारामांची गरज नव्हती - राज  ठाकरे; गोरेगाव येथील प्रचार सभेत आरे बचाव, मुंबई मेट्रो 3 सह सरकारवर टीका करताना पहा काय म्हणाले मनसे प्रमुख
Raj thackeray (Photo Credit: IANS)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या प्रचाराची सुरूवात राज ठाकरे यांनी आज मुंबईमधून केली आहे. सांताक्रुझ आणि गोरेगाव येथे राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळेस आरे बचाव मोहिमेपासून, ईडी चौकशी प्रकरण ते भाजपा-शिवसेना मध्ये आयारामांचा पक्षप्रवेश यावर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'माझ्या हातात सत्ता द्या सार्‍यांना सुतासारखा सरळ करतो' असं म्हणणारे राज ठाकरे यांनी 'मला सक्षम विरोधी पक्ष करा' असं आवाहन करत मतांचा जोगवा मागितला आहे. Raj Thackeray Speech: विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार जनतेवर बुलडोझर फिरवेल- राज यांची सरकारवर टीका

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सार्‍यांचं लक्ष लागले होते. मात्र राज ठाकरे यांनी अशा चौकशीनंतरही माझं थोबाड बंद राहणार नाही असं म्हटलं आहे. राजकारणाचा खेळ करून ठेवलेल्यांविरोधात आवाज उठवा असं म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सत्ताधार्‍यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राला प्रबळ विरोधकाची गरज आहे. मनसेला विधानसभेत सक्षम विरोधक पाठवा असं म्हणतं मतं मागितली आहे.

मुंबई मेट्रो साठी कारशेड साठी आरेमध्ये वृक्षतोड करायची काय गरज आहे? असा सवालही विचारला आहे. विकास आणि प्रगतीला विरोध नाही पण वनसंपत्तीचा नाश करून हे करणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. बीपीटी मधील जागा रिकामी आहे ती कशासाठी वापरणार? हा प्रश्नदेखील राज ठाकरेंनी विचारला आहे.

कलम 370 वरही राजा ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा आणि कश्मीर मधील कलम 370 काढण्याचा संबंध काय? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.