महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिली सभा अखेर आज (ऑक्टोबर 10) मुंबईत पार पडली. मुंबईत आज त्यांच्या 2 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा सांताक्रुझमधील मराठा कॉलनीत नुकतीच पार पडली तर पुढील थोड्याच वेळात दुसरी सभा गोरेगावमधील एम. जी. रोडवरील आझाद मैदानात होणार आहे.
'लाव रे तो व्हिडिओ' या त्यांच्या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख न करत त्यांनी यावेळी एक सक्षम विरोधी पक्षाची राज्याला गरज असल्याचे सांगितले आहे.
सभेतील भाषणाला सुरुवात करताच त्यांनी सर्वात आधी मुंबईत होणाऱ्या सध्याच्या वाहतूक कोंडी या विषयाला हात घातला. ते म्हणाले, "हल्ली प्रवासाला जास्त वेळ लागतोय आणि भाषणाला कमी वेळ मिळतोय."
शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर भाष्य करत ते म्हणाले, "शहराचा बिचका झालाय व रोजच्या रोज शहरं बरबाद होत आहेत." तसेच काल झालेल्या पुण्यातील पावसाबद्दल बोलताना, "पुण्यासारखे शहर अर्ध्या तासाच्या पावसात बुडते, शहर नियोजनाचं काय?" असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
पीएमसी(PMC) बँकेच्या घोटाळ्याचा मुद्दाही त्यांनी आपल्या भाषणात मांडला. ते म्हणाले, "पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?"
आगामी विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकांमध्ये एक भूमिका घेतली आहे. तीच मी मांडणार आहे. या राज्याला सध्या कणखर प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. ज्यावेळी सत्ता आवाक्यात असेल तेव्हाच सत्ता मागेन, पण आजच्या घडीला विरोधी पक्षाचीच जास्त आवश्यकता आहे. आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल."
तसेच, "मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन आलोय , असं म्हणत त्यांनी आपलं मुद्दा जाणते समोर ठेवला.