RajThackeray (Photo Credits: File Photo)

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशात परतीच्या पावसाला वेग आला आहे. 9 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची विधानसभेसाठी पहिली सभा पुण्यात (Pune) आयोजित केली होती. मात्र त्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला व ही सभा होऊ शकली नाही. म्हणून रस्त्यांवर सभा घेण्यासाठी परवानगी द्या अशा आशयाचे पत्र मनसेने निवडणूक आयोगाला (Election Commission) लिहिले आहे. आता राज ठाकरे यांची 14 ऑक्टोबर रोजी कसबा विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी आरक्षित मैदाने असतात. मात्र अवकाळी पावसामुळे अशा मैदानांमध्ये चिखल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आता शहरांमधील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, असे पत्र मनसेकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. काल राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवेळी मोठा पाऊस झाला. मैदानात चिखल झाल्याने ही सभा रद्द करावी लागली होती. नाईलाजाने कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे परत आले होते. (हेही वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: राज ठाकरे यांची पुणे येथील पहिली सभा पावसामुळे रद्द)

पुण्यानंतर त्यानंतर आज मुंबईत सायंकाळी सहा वाजता सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये पहिली सभा, तरस दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या विधानसभा प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथे सभा पार पडणार आहे. त्यासाठी मैदाने आधीच आरक्षित केली गेली आहेत. मात्र पावसामुळे या मैदानांमध्ये पाणी साचत असल्याने, राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागले.