महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (6 मार्च) पत्रकार परिषदेत विवध मुद्द्यांवर भाष्य केले. मूळ मुद्द्यांपासून प्रसारमाध्यमं भटकत आहेत. असे अनेक प्रकरणांमध्ये घडते. अंबानी यांच्या निवास्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या भरलेली गाडी ठेवल्याच्या प्रकरणातही असेच घडताना दिसत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला हा विषय महत्त्वाचा नाही तर अंबानी यांच्या निवास्थानाजवळ पोलिसांनी जिलेटीनच्या कांड्या भरुन गाडी नेमकी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? हा विषय महत्त्वाचा आहे. परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांना मंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर 100 कोटी रुपयांबाबत साक्षात्कार झाला. त्यांना तो आधी का झाला नाही. जर त्यांना पदावरुन हटवले असते तर ते हे बोलले असते का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. या वेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य सरकारसाठी केलेल्या काही सूचनांचीही माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात तिथे कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे, याकडे राज ठाकरे यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले. मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही. छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी. लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची का, असा सवालही राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थीत केला. (हेही वाचा, Raj Thackeray's press Conference: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ऑनलाईन संवादानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद)
आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी
राज्यात सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले, हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे. पण ही ती वेळ नाही. अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.