Raj Thackeray | (Photo Credits: YouTube)
Raj Thackeray यांच्यावर महिन्याभरापूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांनी ऑनलाईन बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्लॅन केला होता. परंतू महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी पूर आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन मेळावा शक्य नसल्याचं सांगत त्यांनी उद्याचा (13 जुलै) मेळावा पुढे ढकलल्याचं एक पत्रक जारी करत जाहीर केले आहे. मात्र या पत्रातच राज ठाकरेंनी मनसैनिकांना पूरग्रस्त भागात शक्य ती मदत करण्याचं देखील आवाहन केले आहे. पूरपरिस्थितीमध्ये सरकारी यंत्रणेवर ताण असतो. त्यामुळे आपल्या कामातून त्यांचा ताण वाढणार नाही याचीही दक्षता घेण्याचं आवाहन राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे. तसेच लवकरच नवी तारीख,वेळ कळवली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

नदीकाठच्या भागात नागरिकांचे प्रचंड हाल होतात अशा ठिकाणी घरात पाणी घुसण्याचा धोका आहे तो लक्षात घेता काळजी घ्या आणि मदत करा असे आवाहन मनसैनिकांना राज ठाकरेंनी केले आहे. तसेच प्रामुख्याने या परिस्थितीमध्ये अपंग, लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्धांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झाडं उन्मळून पडतील तिथे पुन्हा झाडं लावण्याचं काम देखील हाती घ्या असेही राज ठाकरे यांनी पत्रात लिहले आहे. नक्की वाचा: Shiv Sena-BJP-MNS: शिवसेना- भाजप भांडणात मनसेला लॉटरी? आमदार प्रमोद पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ?

राज ठाकरे यांचं पत्र

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार होते. दरम्यानच्या काळात शिंदे गट, भाजपा यांच्यासोबत त्यांची बोलणी झाली होती पण त्यावर अद्याप थेट राज ठाकरेंची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या सार्‍यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुर्ळाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान जून महिन्यात  राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर पुढील काही महिने त्यांना सक्तीचा आराम करण्याचा वैद्यकीय सल्ला आहे.