Shiv Sena-BJP-MNS: शिवसेना- भाजप भांडणात मनसेला लॉटरी? आमदार प्रमोद पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये बंडाळी करुन सत्तेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट भाजपला जाऊन मिळाला आहे. भाजपला सोबत घेऊन एकनाथ शिंदे गटाने राज्यात सरकारही स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अद्यापही या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. पण तो लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. अशात मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल या अशेने अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. यात आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचेही नाव आले आहे. कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP-MNS) भांडणात मनसेला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकमेव मनसे आमदार प्रमोद पाटीलयांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अचानक आपली तलवार मॅन केली. इतकेच नव्हे तर हिंदुत्त्व, हनुमान चालिसा असे मुद्दे घेत भाजपला पुरक असेच राजकारण सुरु केले. राज ठाकरे यांच्यात झालेला हा बदल अनेकांसाठी अनाकलणीय ठरला. या धक्क्यातून लोक सावरतात तोवरच राज्यसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने विनाअट भाजपला पाठिंबा दिला. मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्याचेच रिटर्न गिफ्ट मनसेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion Soon: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस)

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात नेहमीच राजकीय धुसफूस पाहायला मिळते. अशा वेळी आता शिवसेनेतील एक प्रबळ गट भाजपसोबत आला आहे. परिणामी ही संधी नामी आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेली शिवसेना-भाजप-मनसे ही राजकीय धुसफूस कायमची संपविण्याचा विचार वरिष्ठ नेतृत्वाकडून सुरु असल्याची चर्चा आहे. विद्यामान शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सत्तेपासून दूर ठेवणे. त्यांचे राजकीय खच्चीकरण करणे हा एकमेव कार्यक्रम असेल तर मग भाजप-शिवसेना आणि मनसे ही दरी का ठेवायची असा सूर काहींकडून आळवला जातो आहे. त्याचीच दखल घेत नेतृत्व ही दरी मिटविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले जात आहे.