Raj Thackeray, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Raj Thackeray and Uddhav Thackeray Together: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापासून चर्चेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असतानाच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना पक्षापासून फारकत घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून उद्धव (Uddhav Thackeray) आणि राज या दोन भावंडांमध्ये सुरु असलेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि संघटनात्मक पातळीवरचे तीव्र पडसात उभ्या महाराष्टाने पाहिले. आता हेच बंधु पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षात झालेली बंडाळी, भारतीय जनता पक्षाने राज्यात सुरु केलेले राजकारण आणि मुंबईत निर्माण झालेली पोकळी पाहता मनसे आणि शिवसेना (UBT) पक्षाने एकत्र यावे अशी मागणी पुढे येत आहे. त्यावरुन आता हे दोन्ही बंधू एकमेकांना टाळी देणार का? याबाबत उत्सुकता आहे.

मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे युतीचा प्रस्ताव घेऊन शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांना भेटल्याचे समजते. संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांनी भांडूप ते प्रभादेवी असा प्रवास एकाच कारमधून केला. या प्रवासात संभाव्य युतीबद्दल प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. सामटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Controversy in Eknath Shinde Faction: मंत्रीपदावरुन राडा, आमदारांची हाणामारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा रद्द; थेट मुंबईला परतले)

शिवसेना आणि मनसे युतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. कोणतीही युती अथवा आघाडी एकतर्फी होत नसते. ती दोन्ही बाजूंनी व्हावी लागते. सध्यास्थितीत तरी याबाबत आपल्याकडे कोणतीच माहिती नाही. जर असा काही निर्णय असेलच तर तो पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतात आणि घेतील, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. दरम्यान, पानसे आणि राऊत यांच्या भेटीबद्दलही आपल्याला काही माहिती नसल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक पोस्टर झळकले होते. या पोस्टरमध्ये मनसे आणि शिवसेना (UBT) युती करुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे अवाहन करण्यात आले होते. मनसेमधीलही काही नेत्यांचे आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला हवे, असे मत असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी याबाबत नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.