Cabinet Expansion 2023: सत्तेचा काटेरी मुकूट सावरता सावरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाकी नऊ येतात की काय अशी स्थिती आहे. शिवसेनेत (Shiv Sena) बंड करुन भाजपसोबत सत्तासोपान चढला करा. पण, सत्तेचा मधूचंद्र संपण्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपात एक नवा भिडू युतीत आला. परिणामी एकनाथ शिंदे गटात टोकाची नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातूनच नुकत्याच झालेल्या मंत्रिमडळ विस्तारात शिंदे गाटातील एकाही आमदाराचा समावेश नसल्याने असंतोष खदखदू लागला आहे. त्यावरुनच शिंदे गटाच्या एका बैठकीत चक्क मंत्रीपदावरुन आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. परिणामी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला नागपूर दौरा अर्थवट सोडून मुंबईला परतावे लागल्याचे वृत्त आहे.
संभाव्य मंत्रिपदावरुन आमदारांमध्ये झालेल्या जोरदार भांडणानंतर एकनाथ शिंदे मुंबईला परतले. त्यांनी वर्षा बंगल्यावर आपल्या समर्थक आमदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न बुधवारी रात्री उशीरपर्यंत सुरु होता, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी असा कोणताही प्रकार आमदारांमध्ये घडला नाही. तसेच, काही लोकांचे गैरसमज झाले होते ते दूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र आमदारांनी प्रसारामाध्यमांसोमर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहता शिंदे गटातील नाराजी पूर्णपणे उघड झाली आहे. (हेही वाचा, Modi Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्र्यात नाराजीची चर्चा)
दरम्यान, आमदारांच्या गटांचा शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. बंड काही मंत्री असलेल्या कोणी एकदोघांनी केले नाही. बंड आम्हीही केले आहे. त्यामुळे मागच्या वर्षापासून जे जे मंत्रिपदावर आहेत त्यांची मंत्रीपदे काढा आणि त्या ठिकाणी आम्हाला मंत्रिपदे द्या, अशी जाहीर मागणी करण्यात आली. तिथेच वादाची ठिणगी पडली आणि मुद्द्यांची चर्चा थेट गुद्द्यांवर आली, असे समजते. लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.
आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आल्याने आता अनेकांना भाकरी वाटून खावी लागणार आहे. ज्यांना एक भाकरी मिळणार होती त्यांना आर्धीवर समाधान मानावे लागणार आहे. ज्यांना आर्धीच मिळणार होती त्यांना चतकोर भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे. आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, नाराजी कोणाची नाही. परंतू, मंत्रीपद आपल्यालाही मिळावे अशी आमदारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.
दुसऱ्या बाजूला, मंत्री शंभूराजे देसाई यांनी तर थेट खळबळजनकच वक्तव्य केले. उद्धव ठाकरे गटाकडून काही साद घातली गेली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असे विचारले असता त्यांनी साद घातली तर आम्ही प्रतिसादाबद्दल विचार करु. पण त्यासाठी त्यांच्याकडून काही यायला तर हवे ना? अशी प्रतिक्रिया दिली. अर्थात शंभूराजे देसाई यांनी नंतर परसारमाध्यमांसमोर आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले.