शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary 2023) यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त शेकडो आजी-माजी शिवसैनिक आणि नेते त्यांना आदरांजली व्यक्त करत आहेत. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाने आपल्या 'मनसे अधिकृत' या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राज ठाकरे शिवसेना सोडण्यापूर्वी झालेल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगताना दिसतात. हा व्हिडिओ राज ठाकरे यांच्या एका सभेतील आहे. मात्र, तो नेमका कोणत्या सभेतील आहे याबाबत समजू शकले नाही. उपस्थीत मनसे कार्यकर्त्यांना बोलताना राज ठाकरे यांनी हा प्रसंग सांगितला आहे. राज ठाकरे नेमके काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.
राज ठाकरे यांना बाळासाहेब काय म्हणाले
''मला आजही ती गोष्ट आठवते.. जेव्हा बाळासाहेबांना कळलं.. की हा (राज ठाकरे) काही राहात नाही पक्षामध्ये. माझी शेवटची भेट होती. मी आजवर कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. मनोहर जोशी बाहेर गेले रुमच्या. बाळासाहेबांनी मला बोलावले.. त्यांनी हात पसरले माझ्यासमोर.. मला मिठी मारली... माला मिठी मारली.. आणि म्हणाले आता जा.. त्यांना समजलं होतं.. एका मुलाखतकाराने मला विचारले..भुजबळांचे बंड.. नारायण राणे यांचे बंड.. शिंदे यांचे बंड.. मी म्हटलं.. राज ठाकरे यांचं बंड नका लावू त्यामध्ये. हे सगळे एका पक्षात गेले. सत्तेत गेले... सत्तेसाठी गेले.. मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटून... सांगून बाहेर पडलो. त्यामुळे मी दगाफटका करुन... पाठित खंजीर खुपसून बाहेर नाही पडलो.... बाहेर पडल्यावर मी कोणत्या पक्षात नाही गेलो.. मी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला.'' (हेही वाचा, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर बीएमसी निवडणुकीसाठी आज करणार युतीची घोषणा)
व्हिडिओ
जा लढ, मी आहे...
काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात...
राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद ! pic.twitter.com/q6FYy9SmDP
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2023
दरम्यान, अनेक बंडं पचवलेल्या शिवसेनेला या वेळी मात्र चांगलाच हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील सुमारे 40 आमदारांनी बंड केले आहे. धक्कादायक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री पदावर असताना हे बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार तर कोसळलेच. परंतू, आता तर एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. याबाबत कायदेशीर लढाया सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा? याबाबत निवडणूक आयोगात खटला सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्रतेच्या मुद्द्यावरुनही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून, तारखा पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.