लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे (Raj Thackeray यांनी मनसे च्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीकडे लक्ष देत विधानसभेच्या तयारीला लागा असं म्हटलं आहे. दरम्यान आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येण्यासाठी अनेकदा विचारणा केली परंतू आपलं जागावाटपाच्या बैठकीत बसण्याचं टेम्परामेंट नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यसभा, विधानपरिषद काहीच नको म्हणत जे चूक असेल त्याला चूक म्हटलं जाईल आणि जे काम चांगलं असेल त्याचं कौतुक केले जाईल असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवसेना, एनसीपी आणि भाजपाच्या महायुतीला आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचं ते म्हणाले आहे.
मनसे अध्यक्ष यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे पण महायुतीत सहभागाबद्दल काहीच म्हटलेलं नाही. आपली अमित शाह यांची भेट झाली आणि त्यांंच्यासोबत चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. पण त्यावेळी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा आणि अफवा आपण केवळ एन्जॉय करत होते असेही ते म्हणाले. आज शिवतीर्थ मैदानावरून कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला संबोधित करताना त्यांनी 'व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका' असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तरूणाईला मोठ्या अपेक्षा आहेत. ही निवडणूक देशासाठी निर्णायक असणार आहे त्यामुळे त्यांनी या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. त्यामुळे मनसे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं चित्र आता दिसत आहे. MNS Gudi Padwa 2024 Melava: कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं स्पष्ट.
मनसेचा महायुतीला पाठिंबा जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. #RajThackerayLive
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 9, 2024
लोकसभेसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आता मनसे महायुतीच्या पाठीशी उभी असणार आहे. दरम्यान महायुती मधील घटक पक्षांनी देखील मनसेच्या या भूमिकेचं स्वागत केले आहे. ठाकरे गटाकडून मात्र वरूण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची जुनी क्लिप शेअर करत हल्लाबोल केला आहे.