Rajgad Fort (Photo Credit - Wikimedia Commons)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी (UNESCO World Heritage List) मध्ये झाला आहे. यामध्ये रायगड, प्रतापगड, पन्हाळा सह जिंजी चा समावेश आहे. सध्या युनेस्कोच्या वारसा यादी मध्ये अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा गुंफा यांचा समावेश आहे. आता शिवरायांच्या किल्ल्यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी ही अजून एक अभिमानाची बाब आहे. 12 किल्ल्यांच्या समावेशासाठी मागील वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दल सोशल मीडीयात आनंद व्यक्त केला आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी मध्ये रायगड, राजगड, पन्हाळा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी चा समावेश करण्यात येणार आहे.

पीएम मोदींनी व्यक्त केला आनंद

संभाजीराजे छत्रपती यांची गडकिल्ल्यांच्या डागडुजीची सरकार कडे मागणी

माजी खासदार आणि भोसले घराण्यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडीयात पोस्ट करत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी मध्ये शिवरायांच्या 12 किल्ल्यांच्या समावेशावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र यावेळी त्यांनी 'जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाल्याने हे किल्ले जागतिक पर्यटन स्तरावर आले आहेत. यामुळे आपला उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगार निर्मिती आदी बाबींनाही चालना मिळणार आहे.

मात्र, युनेस्को कडून या स्थळांच्या विकासासाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे या गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक आहे. या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन, संवर्धन व विकासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. या बारा किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धन कार्य राज्य सरकारने हाती घ्यावे व उर्वरीत किल्लेही या यादीत समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्नशील राहावे.' अशी मागणी केली आहे.  वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या या गडकिल्ल्यांना एकदा नक्की भेट द्या.

फेब्रुवारी महिन्यात आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे.