महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी झालेल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल लावला. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी करताना काल त्यांनी शिंदे आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. अपात्रतेच्या निकालामध्ये कुणीच अपात्र न ठरल्याने अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांनी नेमका हाच प्रश्न निकालानंतर प्रतिक्रिया देतानाही विचारला. दरम्यान राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी टीव्ही 9 सोबत बोलताना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा पक्षाच्या व्हीप च्या उल्लंघनावर अवलंबून असतो हे मान्य पण तो व्हीप आमदारांपर्यंत योग्य रित्या पोहचला आहे की नाही? यावरही अवलंबून असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना भरत गोगावले यांचा व्हिप योग्यरित्या पोहचला की नाही हे तपासून निर्णय देण्यात आला त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. . (हेही वाचा, Rahul Narvekar Verdict about Shiv Sena: शिवसेना पक्ष कोणाचा? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला निर्णय)
दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे गट अशी विभागणी झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय दिला तसेच प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप वैध असल्याचा निर्णयही दिला आहे. शिंदे गटाने आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना वगळता अन्य 14 आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका केली होती. (हेही वाचा, Shiv Sena MLA Disqualification Case: संविधानानुसार निकाल आल्यास 16आमदार अपात्र; आदित्य ठाकरे यांना विश्वास)
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुनावताना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा निकाल दिला होता. त्यानंतर वेळापत्रक लावत अखेर काल (10 जानेवारी) अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.