शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) आज (10 जानेवारी 2023) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) जाहीर करणार आहेत. या निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. दरम्यान, याच निकालावरुन शिवसेना (UBT) आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे जर निकाल आला तर 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत. मात्र, जर काही वेगळा आणि संभ्रम करणारा निकाल आला तर मात्र, हा निकाल कोठेतरी भाजपने दिलेल्या वेगळ्या संविधानावरुन आला की काय अशी शंका निश्चित उपस्थित होईल, असेही ते म्हणाले.
'न्यायाधीश आरोपीच्या भेटीला'
आदित्य ठाकरे कोल्हापूर येथून प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधनसभा अध्यक्षांवरही जोरदार प्रहार केला. विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे ते कधीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात नाहीत. जर त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांनाच आपल्याकडे बोलावतात. पण सर्व संकेत बाजूला सारत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हा प्रकार आजवरच्या इतिहासामध्ये केव्हाही घडला नव्हता. विधानसभा अध्यक्षांचे वागणे म्हणजे न्यायाधीशांनीच आरोपीला भेटायला जाण्याचा प्रकार आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. (हेही वाचा, MLA Disqualification Case in Maharashtra: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात 'आमदार अपात्र' प्रकरणी विधानसभा अध्यक्ष सुनावणार फैसला!)
'विधानसभा अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा राखावी'
विधानसभा अध्यक्ष यांनी पदाची प्रतिष्ठा राखून निर्णय द्यावा. प्रकरण कोणतेही असले तरी पद आणि पदाची प्रतिष्ठा आणि देशाची घटना महत्त्वाची ठरते. आजचा निकाल हा केवळ एका पक्षासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा असेल. अध्यक्षांनी जर राज्यघटना आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेतला तर 16 गद्दार आमदार अपात्र होतील. तसेच, घटनाबाह्य सरकारही बदलेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची मिलीभगत! त्यांना लोकशाहीची हत्या करायची आहे? उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात प्रतित्रापत्र)
'घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या गद्दारीची 33 देशांनी घेतली नोंद'
राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात त्यांनी केलेल्या कृतीची नोंद जगभरातील 33 देशांनी घेतली. या देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली काय? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, होय, हे सरकार घटनाबाह्य आहे. या लोकांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे मी त्यांना गद्दार म्हणत राहणार. हे सरकार खोके सरकार आहे. खोक्यांच्या जीवावरच हे सरकार चालवत आहेत. म्हणूनच महाराष्ट्राला ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात महाविकासआघाडी सरकार असताना पूर्ण झालेल्या विकासकामांची उद्घाटने अजूनही झाली नाहीत. काम पूर्ण झाले असताना ही उद्घाटने कशासाठी रखडली आहेत? कोण असे व्हिआयपी आहेत, ज्यांची वाट पाहिली जाते आहे आणि जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे?, असे सवालही त्यांनी सरकारला विचारले आहेत.