
यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Rural Police Station) अंतर्गत रहिवासी असलेल्या मधुकर शामराव बोंबले या व्यक्तीस 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नीता मखरे यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse) प्रकरणात पोक्सो (POCSO Act) कायद्यान्वये ही शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील पीडिता अवघी नऊ वर्षांची होती आणि धक्कादायक असे की, दोषारोप सिद्ध झालेला नराधम मधुकर बोंबले हा नात्याने चक्क तिचा चुलत आजोबा आहे. मार्च 2022 मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा जानेवारी 2025 मध्ये निकाल लागला.
खोलीला आतून कडी, भावाच्या घरात अत्यचार
नऊ वर्षांची अल्पवयीन पीडिता हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे ती आपल्या आईसोबत राहते. त्याचा फायदा घेत मधुकर शामराव बोंबले याने मार्च 2022 मध्ये पीडितेस एकटे गाठले. तिला आमिश दाखवले आणि तीस तो स्वत:च्या भावाच्या घरात घेऊन गेला. घरातील खोलीला आतून कडी लावली आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडितेवर अत्याचार सुरु असतानाच तिच्या काकाने बाहेरुन आवाज दिला. त्यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने पीडितेला सोडून दिले. दरम्यान, खोली बाहेर आलेली मुलगी घाबरली होती. ती रडत होती. त्यामुळे इतरत्र असलेली तिची आई आणि इतर काकाही तिथे आले. पीडिता घाबररेल्या अवस्थेतर रडत असल्याचे पाहून त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तिच्या शरीराची तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुढे आले. ज्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. (हेही वाचा, Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक)
पीडितेच्या कुटुंबास आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी
पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीकडे विचारणा केली असता ओरोपीने अत्यंत उद्धट वर्तन केले. 'जर माझी तक्रार कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हा सर्वांना ठार मारेन', अशी धमकी दिली. पीडितेचे वडील म्हणजेच तिच्या आईच्या पतीचे निधन झाल्यामुळे या मायलेकी असहाय होत्या. त्यांची जबादारी घेणारे विशेष असे कोणी नव्हते. त्यामुळे सुरुवातील काही दिवस पीडितेची आई भीतीच्या छायेत होती. त्यामुळे तिने पोलिसांमध्ये तक्रार देणे टाळले. मात्र, कुटुंबीय, नातेवाईक आणि इतरांनी धीर दिल्यानंतर मात्र तिने पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्याची माहिती आरोपीस कळताच त्याने पीडितेच्या काकास मारहाण केली. (हेही वाचा, Yavatmal Crime: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पतीकडून पत्नीसह चौघांची हत्या)
दाखल गुन्ह्यातील सर्व कलमांनुसार आरोपीस शिक्षा
दरम्यान, प्राप्त तक्रारीवरुन पुसद ग्रामीण पोलिसांनी पोक्सो कायदा-2012 कलम 4,8,12 आणि भारतीय दंड संहिता कलम- 376, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळताच दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाकडून एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. तर आरोपीकडून आपल्यावर केले जाणारे आरोप आणि दाखल तक्रार केवळ जमीनिच्या वादातून केल्याचा आणि गुन्हा सिद्ध होत नसल्याचा बचाव करण्यात आला. मात्र, कोर्टाने पीडिता, तिची आई आणि काका यांची साक्ष महत्त्वाची मानत निकाल दिला. आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे आरोपीविरुद्ध दाखल झालेल्या सर्व कलमांनुसार आरोपीस शिक्षा झाली. वकील सुनिता शर्मा यांनी सरकारी पक्षाकडून पीडितेची बाजू मांडली.